धुळे जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी : जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती




धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह अन्य दुकाने/आस्थापना मंगळवार 1 जून 2021 पासून सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीत येत्या आठवडाभरासाठी उघडण्यास सशर्त मंजुरी देण्यात येत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बैठकीत सर्वानुमते ठरले आहे. मात्र, पॉझिटिव्हीटी मध्ये  वाढ झाल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात असली, तरी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आवश्यक ती काळजी न घेतल्यास  तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला खबरदारी बाळगावी लागणार आहे. व्यापारी, ग्राहकांनीही कोरोना विषाणूविषयक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक आस्थापना मालकासह आस्थापनेत कार्यरत कामगारांची दर आठवड्याला कोरोना विषयक चाचण्या करणे अत्यावश्यक आहे. तसेच दर शुक्रवारी  कोरोना पॉझिटिव्हिटीचा आढावा घेवून पॉझिटिव्हीटी वाढताना दिसल्यास शिथिल केलेल्या निर्बंधांबाबत पुनर्विचार करण्यात येईल. शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कार्यवाहीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असतील.
अश्या कोरोना विषयक नियमांच्या अंमलबजावणी होते किंवा कसे हे तपासण्यासाठी महानगरपालिका, पोलिस व प्रांत अधिकारी यांनी नेमलेले क्षेत्रीय अधिकारी यांची संयुक्त फिरती पथके गठित करावीत. तसेच व्यापक जनजागृतीसाठी मोहीम राबवावी. व्यापारी महासंघाने आपल्या स्तरावर पथके गठित करून व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे. कोरोना बाधित रुग्णांसाठी असलेली गृह विलगीकरणाची सुविधा पूर्णत: बंद करन अशा रुग्णांना नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या.  
पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी सांगितले, गर्दी टाळण्यासाठी आस्थापनांनी नियोजन करावे. व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनेटायझर, दो गज की दुरी या सूत्राचा नियमितपणे वापर करावा. महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेख यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेतर्फे आस्थापना मालक व कामगारांची दर आठवड्याला तपासणी करण्यात येईल. मात्र, व्यापाऱ्यांनी मास्क, सॅनेटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक राहील. श्री. बंग यांनी सांगितले, की सर्व व्यापारी बांधव राज्य शासनाच्या नियमांचे पालन करतील. तसेच दर आठवड्याला कोरोना चाचणी करून घेतील. प्रशासनाच्या सहकार्यासाठी व्यापाऱ्यांची पथके गठित करण्यात येतील, असे सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने