धुळे, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूमुळे (COVID-19) एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके व त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय योजनांचे लाभ पात्रतेनुसार तातडीने मिळवून देत पुढील बैठकीत अहवाल सादर करावा, असे निर्देश कृती दलाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी ‘कोविड-19’ दरम्यान पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची (Task Force) बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक बी. एम. मोहन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, तहसीलदार सुचेता चव्हाण, आशा गांगुर्डे (संगांयो), जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्री. चव्हाण, बालविकास अधिकारी एम. एम. बागूल, निरीक्षण गृहाच्या अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲङ अमित दुसाने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, ‘कोविड – 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांपर्यंत पोहोचून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. अशा बालकांचे शिक्षण, उदरनिर्वाहाची काळजी घेण्यात येईल. एक पालक गमावलेल्या बालकांच्या मातेला कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून आवश्यक ते प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी उपगट कार्यान्वित करावेत. पात्रतेनुसार या गटांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, बालसंगोपन योजनेचे लाभ मिळवून द्यावेत. त्यांनी आठवडाभरात कार्यवाही करून अहवाल सादर करावेत. मुलांच्या शैक्षणिक शुल्काबाबत शाळा व्यवस्थापनाशी संवाद साधण्यात येईल. घर नावावर करणे, वारस नोंदविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात यावा. कुटुंब निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी ‘कोविड – 19’ मुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. दास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक श्री. मोहन, बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. दुसाने, स्वयंसेवी संस्थेच्या मीना भोसले, ॲड. चौधरी यांनी विविध सूचना केल्या.
बालकांसाठी हेल्पलाइन
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना काही समस्या असल्यास त्यांनी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098, 83089-92222 (सकाळी 8 ते रात्री 8), 7400015518 (सकाळी 8 ते रात्री 8) येथे किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, धुळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, 52, जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटलसमोर, देवपूर, धुळे (दूरध्वनी : 02562- 224729), अध्यक्ष, सदस्य, बालकल्याण समिती, धुळे, मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. भदाणे यांनी केले आहे.
Tags
news
