दोंडाईचा येथील घटनेची सी.आय.डी. चौकशी व्हावी; शिंदखेडा तालुका शिवसेनेची मागणी



 

दोंडाईचा (प्रतिनिधी) : दि. 31 मार्च रोजी दोंडाईचा येथे घडलेल्या घटनेची सी.आय.डी. चौकशी व्हावी अशी मागणी तालुका शिवसेनेतर्फे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, धुळे जिल्हा (ग्रामीण) चे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, तालुकाप्रमुख गिरीश देसले, उपजिल्हासंघटक कल्याण बागल, युवासेना तालुकाप्रमुख आकाश कोळी, उपशहर प्रमुख विजय भोई, आबा चित्ते, सागर पवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ना.सत्तार यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले की, दोंडाईचा शहरात दि. 31 मार्च 2021 च्या मध्यरात्री मुलीच्या छेडखानीवरुन दंगल झाली. यात पोलीस ठाण्यावर जमावाची दगडफेक, दंगल नियंत्रणासाठी पोलीसांचा गोळीबार, गोळीबारात दोन मुस्लीम युवक जखमी, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथे गोळीबारातील जखमींना नेतांना पुन्हा दंगल, दंगलीत मुस्लीम तरुणाचा संशयास्पद मृत्यु, अशा प्रकारच्या घटना घडल्यात. त्यामुळे दोंडाईचा शहरासह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले.

सदर दंगल नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने योग्य वेळी दखल घेऊन दोंडाईचा शहरात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वीही झाला. दोंडाईचा शहरात घटलेला घटनाक्रम अत्यंत निषेधार्ह आहे. गेल्या अनेक वर्षापासून हिंदू-मुस्लीम ऐक्य दोंडाईचा व तालुक्यात आहे. असे असतांना एक शुल्लक कारणांवरुन दंगल उसळली आणि त्या दंगलीने रौद्र रुप घेऊन दोंडाईचा शहरातील शांतता भंग केली व काही समाजकंटकांनी हिंदू-मुस्लीम ऐक्य भंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी गोळीबार केल्यामुळे परिस्थिती अजुन चिघळली. त्याचा परिणाम झाला तो झाला. दंगलीत एका निरापराध मुस्लीम तरुणाचा मृत्यु झाला. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे. जे कुणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे.

परंतु, राजकीय द्वेषापोटी एखाद्या निरपराध माणसाचा बळी जाऊ नये ही भूमिका शिवसेनेची असून दोंडाईचा शहराचा व शिंदखेडा तालुक्याचा गत इतिहास पाहता सदर घटनेची निष्पक्ष चौकशी होणेसाठी सी.आय.डी. चौकशी करण्यात यावी, असेही निवेदनात शेवटी नमुद केले आहे. 


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने