शहादा (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून निघालेल्या परिपत्रकानुसार खबरदारीपूर्व उपाय योजना म्हणून मंदाणे (ता.शहादा) येथील दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहणार असून काही दिवसांनी येणारा यंदाचा भोंगऱ्या बाजारही रद्द राहणार आहे. तरी व्यावसायिकांनी व ग्रामस्थांनी बाजारपेठेत व गावांत गर्दी करू नये असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या आठवड्याभरापासून गावात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार मंदाणे (ता.शहादा) येथे दर गुरुवारी भरणारा व काही दिवसांनी होणार भोंगऱ्या बाजार बंद करण्यात आला आहे. मंदाणे येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो व दरवर्षी होळीच्या पूर्वी आदिवासी बांधवासाठी पर्वणी असलेला भोंगऱ्या बाजार भरला जातो.दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात मंदाणेसह परिसरातील तसेच मध्य प्रदेशातील नागरिक व व्यावसायिक मोठ्या संख्येने मंदाण्यात येत असतात. त्यामुळे मंदाणे गावाला जिल्ह्यात व नजीकच्या मध्य प्रदेश राज्यात मोठ्या बाजारपेठे चे गांव म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर दरवर्षी मंदाण्यापासून भोंगऱ्या बाजाराची सुरुवात जल्लोषात होते. लोकगीते, गायन, नृत्य, बासरी व ढोलच्या आवाजात आदिवासी बंधू व नागरिक मंत्रमुग्ध होऊन जल्लोषात भोंगऱ्या साजरा करतात. मात्र हा सर्व प्रकार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी पहावयास मिळणार नाही. यावर्षी मंदाणे गावात भोंगऱ्या बाजार भरला जाणार नसल्याने व गुरुवारी भरणारा आठवडे बाजार ही बंद असणार असल्याने विक्रेत्यांनी व नागरिकांनी बाजारासाठी येऊ नये असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
संपूर्ण देशभरात कोरोना पसरु नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत असून महाराष्ट्रात ही कोरोनाला प्रतिबंद व्हावा म्हणून शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात गर्दी होऊ नये म्हणून गर्दी होणाऱ्या सर्वच घटकांवर बंदी आणण्यात येत आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग लवकर होतो. गावात रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने खबरदारीच्या उपाय योजना म्हणून ग्रामपंचायतीने गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विनाकारण गावात फिरू नये, गर्दी करू नये तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देखील ग्रामपंचायतीकडून देण्यात आल्या आहेत.
Tags
news
