कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जावून करावे सर्वेक्षण ! : जिल्हाधिकारी संजय यादव

 





कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

धुळे, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूने बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ ही गंभीर बाब असून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेच्या धर्तीवर प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात यावे. चाचण्यांची संख्या वाढवावी. गृह विलगीकरणातील बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करीत विना मास्क फिरणाऱ्या प्रत्येकाला दंड ठोठावून त्यांची चाचणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), कोरोनाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, सुरेखा चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांबरोबरच पॉझिटिव्हीटी दरही वाढला आहे. याची दखल केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यांच्या निर्देशानुसार आता उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे कन्टेन्मेन्ट झोनची कठोरपणे अंमलबजावणी करावी. विना मास्क फिरणाऱ्यांवर संयुक्तपणे कारवाई करावी.  कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित करावेत. तेथे आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.  विवाह सोहळ्यांत निर्धारित संख्येपेक्षा अधिक व्यक्ती असतील, तर कारवाई करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या. 
फिव्हर क्लिनिक कार्यान्वित करून त्यांची संख्या वाढवावी. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या भागात निरीक्षक नियुक्त करून दररोज अहवाल सादर करावा. तसेच रॅपिड रिस्पॉन्स्‍ पथके गठित करावीत. याशिवाय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. तेथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.  उपविभागीय अधिकाऱ्यांनी झोनल अधिकाऱ्यांना सूचना देत निगराणी ठेवावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले.
00000

जिल्हाधिकारी म्हणतात…

* प्रत्येक रुग्णामागे किमान 20 जणांची चाचणी करा
* कोविड केअर सेंटर कार्यान्वित करावेत
* महसूल, पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त कारवाई करावी 
* गर्दीच्या ठिकाणांना वेळोवेळी भेट देवून पाहणी करावी
* पोलिस अधीक्षक, आयुक्तांसह पुन्हा करणार पाहणी
* पुढील आठवड्यापासून धुळे जिल्ह्याचा पाहणी दौरा करणार
* विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने