थाळनेरला पाणी पुरवठा योजनेची चौकशी




थाळनेर ( प्रतिनिधी) मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्फत झालेल्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील पाणी पुरवठा योजनेतील निकृष्ट कामांची पंचायत समिती सदस्य विजय बागुल यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी नुकतीच करण्यात आली.
     याबाबत थोडक्यात वृत्त असे की मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग धुळे यांच्यामार्फत शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सन २०१७/२०१८मध्ये १२७६९७४३ रुपयांची गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. सदर योजनेचे काम ठेके दाराने १५ महिन्यात पूर्ण करायचे होते. सदर योजना पूर्ण झाल्यानंतर किमान तीन वर्षे योजना चालवणे कंत्राटदारावर बंधनकारक होते. सदर योजना पूर्ण झाल्यानंतरच ठेकेदाराला अंतिम देयके अदा करण्यात येणार होती. परंतु सदर ठेकेदाराने संथगतीने काम सुरू केले होते. त्यामुळे ४ वर्षानंतरही सदर योजना पूर्ण झालेली नाही. सदर योजने बाबत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत व नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या होत्या. याबाबत पंचायत समिती सदस्य विजय बागुल यांनी ८/२/२०२१रोजी गटविकास अधिकारी शिरपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तसेच पंचायत समितीच्या मासिक सभेत हि सदर निकृष्ट योजनेबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी शिरपूर यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि प धुळे यांना लेखी कळवले होते.
  ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्‍हा परिषद धुळे यांनी सदर तक्रारीची दखल घेऊन २३/२/२०२१ रोजी येथील पाणीपुरवठा योजना कामाची चौकशी करून अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करण्याचं पत्र उपअभियंता साक्री यांना दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने तब्बल एक महिन्यानंतर साक्री येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता ए.आर. पाटील यांनी थाळनेरला चौकशीसाठी भेट दिली. त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने बसस्थानकाजवळील पाण्याची टाकी, जमादारपाडा, दामशेरपाडा, मच्छी बाजार आदी भागात जाऊन पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांवर नागरिकांनी तोंडी तक्रारींचा भडिमार केला. नागरिकांनी अनेक भागात जुन्या पाइपलाइनद्वारे पाणी येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.तसेच अनेक भागात आजपर्यंत नवीन पाणीपुरवठा योजनेततुन पाणीच आले नसल्याचं सांगितले.तसेच अनेक ठिकाणी पाण्याचे लिकेज दाखवले त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
   यावेळी पंचायत समिती सदस्य विजय बागुल, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडीले, शाम भील, विकास सोसायटीचे चेअरमन दिनकरराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुकेश ठाकरे, कुबेर जमादार, दिलीप कोळी, रवींद्र तवर, रामकृष्ण बोरसे, अक्षय पाटील, भैरव जमादार, सुनील पाटील, ग्राम विकास अधिकारी वेताळे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सदर अधिकाऱ्यांनी २/३ तासात चौकशी आटोपती घेतल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने