अवकाळी पावसाबाबत हवामान खात्याकडून सूचना



नंदुरबार -  दि.18:  जिल्ह्यात 22 मार्च 2021 पर्यंत विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि शेतकऱ्यांना आपला शेतमाल सुरक्षितस्थळी ठेवण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

विजेचा कडकडाट होत असल्यास बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळ कुठल्याही इमारतीचा आसरा नसल्यास सखल जागेत गुडघ्यात डोके घालून बसावे. विजा चमकतांना  घरात किंवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा. घराची बाल्कनी, छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरात असल्यास घरातील विद्युत उपकरणे बंद करा. तारांचे कुंपण,  वीजांचे खांब आदी लोखंडी वस्तूपासून दूर रहावे. पाण्यात उभे असल्यास त्वरीत पाण्याबाहेर यावे.

विजा चमकत असताना घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करू नका. घरातील बेसीनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका. वादळी वारे वाहत असताना लोखंडी आधाराच्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेवू नका. उंच झाडाखाली आसरा घेवू नका. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका. उघड्या दारातून किंवा खिडकीतून  वीज पडताना पाहणे  बाहेर थांबण्याइतकेच धोकदायक आहे.

 नागरिकांनी या सूचनांचे पालन करावे आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने