धुळे जिल्ह्यात 27 मार्च सायंकाळ पासून मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत निर्बंध घोषित जिल्हाधिकारी संजय यादव : नागरिकांनी सहकार्य करावे



धुळे, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यात शनिवार 27 मार्च 2021 रोजीच्या सायंकाळी 8 वाजेपासून ते मंगळवार 30 मार्च 2021 रोजीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी  भारतीय साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये विविध निर्बंध घोषित केले आहेत. 
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू असून अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. देशासह राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे निर्देश दिले आहेत.
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व या विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. धुळे जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात व  ग्रामीण क्षेत्रात काही निर्बंध लागू करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी धुळे जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात व ग्रामीण क्षेत्रात शनिवार 27 मार्च 2021 रोजीच्या सायंकाळी 8 वाजेपासून  ते मंगळवार 30 मार्च 2021 रोजीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत विविध निर्बंध घोषित करण्याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांनी या कालावधीत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
धुळे जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात व ग्रामीण क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक- खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे 28 मार्च 2021 रोजी साजरा होणारा होळी सण- उत्सव तसेच 29 मार्च 2021 रोजी साजरा होणारा धूलिवंदन सण व शब्ब- ए - बारातचा कार्यक्रम हा कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होईल व जनतेचे आरोग्य धोक्यात येईल, अशा रीतीने साजरा करण्यास मनाई करण्यात येत आहे. 
मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे जमावबंदी आदेश धुळे जिल्ह्यात लागू करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात व संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात घोषित करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी पोलिस, महसूल यंत्रणा, महानगरपालिका व नगर परिषद, नगर पंचायत व त्या- त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची संयुक्तिक राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा, फौजदारी प्रक्रिया संहितेतील तरतुदीनुसार संबंधित शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
या कालावधीत धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात व संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात काय सुरु राहणार त्याचा तपशील असा : रेल्वे, बस, विमान सेवा, जिल्ह्यातंर्गत प्रवासी वाहतूक, टॅक्सी, कॅब, रिक्षा (अत्यावश्यक आरोग्य सेवा व परीक्षा), चार चाकी वाहने केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरीता तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचाऱ्यांची वाहने व परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (केवळ 1+2), दुचाकी वाहने केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचाऱ्यांची वाहने व परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (केवळ 1+1), मेडिकल स्टोअर्स, कुरीअर सेवा, दूध खरेदी- विक्री केंद्रे (सकाळी 5 ते 9 व सायंकाळी  5 ते 8), कृषी संबंधित कामे, कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य, औद्योगिक आस्थापना, अत्यावश्यक सेवा, आयकर विषयक आस्थापना, शासकीय कार्यालये, बँका व वित्तीय संस्था, पोस्टल सेवा, पेट्रोल पंप (फक्त अत्यावश्यक सेवांची वाहने व ऑटो रिक्षा तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचाऱ्यांची वाहने व परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी), हॉस्पिटल व वाहतूक ॲम्ब्यूलन्स सेवा व सर्व वैद्यकीय, सर्व प्रकारची माल वाहतूक, वृत्तपत्र, मीडिया सेवा, ज्या ठिकाणी पूर्व नियोजित परीक्षा असतील त्या नियोजित वेळी व ठिकाणी होतील. (पूर्व नियोजित परीक्षांना सूट देण्यात आलेली आहे.) घरगुती गॅस सिलिंड वाहतूक सेवा, पशुवैद्यकीय सेवा.
धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात व संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात काय बंद राहणार याचा तपशील असा :  धुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, हॉटेल, रेस्टॉरंट (होम डिलीव्हरी, पार्सल वगळता), किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी - विक्री केंद्रे, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शॉपिंग मॉल्स, मार्केट, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बार्बर शॉप, स्पा, सलून, गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षक गृहे, क्रीडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणी, प्रदर्शने, मेळावे, संमेलने, सामूहिक स्वरुपाचे गर्दी करणारे सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम, खासगी कार्यालये. या निर्बधातून सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी असणारा अधिकारी, कर्मचारी वर्ग व परीक्षार्थी यांना सूट राहील. मात्र, संबंधितांनी त्यांचे ओळखपत्र व परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत बागळणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने