* मास्कचा वापर न करणाऱ्यांना 200 रुपये दंड
* डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरची तपासणी होणार
* खासगी डॉक्टरांकडून नियमितपणे घेणार आढावा
* गृह विलगीकरण, अलगीकरणातील रुग्णांची होणार तपासणी
* बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींची होणार चाचणी
* कन्टेन्मेन्ट झोनचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
* कोविड संशयित रुग्णाची माहिती आरोग्य यंत्रणेस देणे बंधनकारक
* विवाह सोहळ्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक
* सर्व हॉटेल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंतच राहणार सुरू
* प्रत्येक विद्यार्थ्यास मास्क लावणे बंधनकारक
* दुकानात एकावेळी मिळणार पाच ग्राहकांनाच प्रवेश
* प्रवासी वाहनांतील संख्येवर निर्बंध
* सार्वजनिक उद्याने पहाटे 5 सकाळी ते 9 पर्यंतच राहणार खुली
धुळे, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी विविध निर्बंध लागू केले आहेत. त्यात विवाह सोहळ्यासाठी फक्त 50 जणांच्या उपस्थितीची परवानगी मिळणार आहे. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. राज्यासह देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये विविध निर्देश दिले आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून त्यावर तत्काळ नियंत्रणासाठी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच संशयित व्यक्तीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती उदभवू नये म्हणून पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या अशा : डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरच्या इमारतींची तपासणी करून त्यात रुग्णांसाठी आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येईल, अशा स्थितीत आणून ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी.
जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टरांचा नियमितपणे आढावा घेवून त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती घेवून त्यापैकी लक्षणे असणाऱ्या संशयित रुग्णांची माहिती घेवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी. खासगी रुग्णालयांना नियमितपणे भेटी द्याव्यात. सौम्य/अति सौम्य लक्षणे असलेल्या कोविड 19 बाधित किंवा संशयित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी गृह विलगीकरण, अलगीकरणाची रीतसर परवानगी घेवून त्याबाबतच्या नियमांच्या पालनाची तपासणी करावी.
कोविड बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टक्टमधील व्यक्तींचा शोध घ्यावा. प्रति बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींचा शोध घेवून त्यांना गृह विलगीकरण, अलगीकरण करावे. बाधित रुग्णांना विषाणूचा संसर्ग कुठून झाला याबाबतचा शोध घेण्यात यावा. एखाद्या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यास त्या परिसरातील व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध लागू करण्यासाठी कन्टेन्मेन्ट झोन तयार करावा. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. स्कॅनिंग सेंटर, खासगी रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी लॅब यांनी संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांचे अहवाल जवळच्या ग्रामीण रुग्णालय व महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी या ठिकाणी आरोग्य विभागाने भेटी द्याव्यात.
विवाह सोहळा, अंत्यविधी व इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यात एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत. विवाहासाठी संबंधित स्थानिक पोलिस ठाणे, तहसीलदार व स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्व परवानगी बंधनकारक राहील. मंगल कार्यालये, लॉन्स, हॉलमध्ये मास्कचा वापर न करणाऱ्या आणि 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात येणार आहे. गर्दीच्या कार्यक्रमांनाही पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. उपहारगृहे, सर्व हॉटेल, रेस्टारंट बार (कॅफे, कॅन्टिन, डायनिंग हॉल, रिसोर्ट, क्लबमधील बाहेरील F&B लायसनधारक युनिट, आऊटलेटसह) आदरातिथ्य सेवा 50 टक्के क्षमतेसह सकाळी ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील. त्याची वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालयात सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मास्कचा वापर करतात किंवा नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक वर्गात सॅनेटायझर किंवा हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. संशयित विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. खासगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनेटायझरचा वापर होतो किंवा नाही याचीही तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी सॅनेटायझरचा वापर करावा. गर्दीची ठिकाणे, भाजी मार्केट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, दुकादार, त्यांचे कर्मचारी, विक्रेत्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच प्रवेशद्वाराजवळ सॅनेटायझर ठेवणे आवश्यक असून एकावेळी फक्त पाच ग्राहकांना प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक आहे. हात धुण्यासाठी साबण किंवा सॅनेटायझर उपलब्ध करून द्यावे. कर्मचाऱ्यांनी दुपारचे जेवण एकत्रित करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर पोलिस दलाने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फिरत्या पथकांनी प्रत्येकी 200 रुपये दंड आकारावा. एसटी बस, ट्रॅव्हल्स, रिक्षा, कॅब, कालिपिली यांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मास्क शिवाय प्रवाशांना वाहनात प्रवेश देवू नये. सार्वजनिक उद्याने सकाळी 5 ते सकाळी 9 यावेळेत व्यायाम, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठीच खुले राहतील. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
वरील सर्व निर्बंधावर आयुक्त, महानगरपालिका, धुळे, सर्व उपविभागीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता, तहसीलदार, जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, औषधे निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलिस विभाग, धुळे शहर महानगरपालिका, सर्व पोलिस निरीक्षक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्राचार्य, शिक्षणाधिकारी, सचिव, सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, संबंधित कार्यालय प्रमुख, कार्यालयातील कोविड अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, करमणूक कर निरीक्षक यांनी ही कारवाई करावयाची आहे.
सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. वारंवार नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापना सील करून गुन्हे दाखल करावेत. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश, निर्देश, नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. तसेच राज्य शासनाकडून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत वेळोवेळी दिलेले आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंडसंहिता, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
Tags
news
