धुळे, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक योजनेचे सन 2021- 2022 या आर्थिक वर्षाचे प्रारुप आराखडे तातडीने सादर करावेत. 2020- 2021 या आर्थिक वर्षात उपलब्ध निधी संपूर्णपणे खर्च होईल, असे नियोजन करावे. तसेच पुनविर्नियोजन प्रस्ताव संबंधित विभागांनी विनाविलंब सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज दुपारी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2020- 2021 या वर्षाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेचे सर्व प्रस्ताव I Pass या संगणक प्रणालीवरच प्राप्त झाले पाहिजेत. त्याची माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करून घ्यावी. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध होणार असून तो मार्च 2021 अखेर खर्च होईल, असे नियोजन प्रत्येक विभागाने करावे. तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत. तसेच अनुपालन अहवालही सादर करावेत. सांख्यिकी सक्षमीकरणासाठी साहाय्य या केंद्रीय योजनेंतर्गत शाश्वत विकास ध्येय अंतर्गत नमूद 17 ध्येयांसाठी कृती कार्यक्रम सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020- 2021 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा, जिल्हा नियोजन समितीच्या 25 जानेवारी 2020 रोजी झालेल्या बैठकीतील अनुपालनाचा सविस्तर आढावा घेतला. समाजकल्याण विभागाच्या समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी अनुसूचित जाती उपयोजनेचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले.
