शिरपूर : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडपॅक्ट-२०२० (इंडस्ट्री-इम्पॅक्ट -२०२०) च्या सर्वेक्षण अहवाला नुसार शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाला सुवर्ण नामांकन घोषित करण्यात आले.
हे सर्वेक्षण आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद व भारतीय उद्योग महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी घेण्यात येते. या सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश संपूर्ण भारतातील तांत्रिक शिक्षण संस्थांचे मुख्यतः उद्योग-समूहांशी असलेल्या सहकार्यपूर्ण संबंधांची पाहणी करणे हा असतो.
भारतीय उद्योग महासंघ - भारतातील उच्च शिक्षणाचा मुख्यतः तांत्रिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मागील काही वर्षा पासून प्रयत्नशील आहे. उद्योगसमूह आणि तांत्रिक शिक्षण संस्था यांच्यामध्ये समन्वय असलाच पाहिजे, तरच उद्योग समूहांना अपेक्षित व आवश्यक असलेले कौशल्यपूर्ण मनुष्यबळ अशा तांत्रिक शैक्षणिक संस्थां मधून निर्माण करता येऊ शकेल. हाच समन्वय उद्योगसमूह तांत्रिक शैक्षणिक संस्था यांच्या परस्पर हिताचा व पर्यायाने समाजहिताचा ठरणार आहे.
हे ओळखूनच भारतीय उद्योग महासंघाकडून विद्यापीठ उद्योग परिषदेची निर्मिती करण्यात आली. विविध प्रकल्पांचे व कार्यक्रमांचे आयोजन या परिषदे मार्फत नेहमी करण्यात येते.
२०१२ पासून आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद व भारतीय उद्योग महासंघ कडून इंडपक्ट सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात येत असून विविध तांत्रिक शिक्षण संस्थाकडून केवळ माहिती गोळा करण्याचा हेतू या सर्वेक्षणाचा नसून उद्योग समूह तांत्रिक शैक्षणिक संस्था यांच्या मधील असलेल्या सहकार्य पूर्ण संबंध जाणून घेणे व त्या अनुशंगाने प्रेरणा देणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू होता. ह्या सर्वेक्षणाने देऊ केलेले पारितोषिके व नामांकने तांत्रिक शिक्षण संस्थांसाठी स्व-मूल्यमापन करण्याचे प्रभावी साधन ठरत आहे. या सर्वेक्षणाची ठळक उद्दिष्टे खालील प्रमाणे :
उद्योगभिमुख व रोजगारभिमुख अभ्यासक्रमाची निर्मिती करणे, तांत्रिक शैक्षणिक संस्थाना उद्योग समूहांशी समन्वय साधन्या साठी प्रोत्साहन देणे, उद्योग समूहांना अपेक्षित असलेले कौशल्ययुक्त मनुष्यबळ (विद्यार्थी) घडविणे, तांत्रिक शैक्षणिक संस्थाना स्वतःचा दर्जा उंचावण्या साठी सतत प्रेरणा देणे.
सुरुवातीला अभियांत्रिकी च्या केवळ सहा शाखां साठी हे सर्वेक्षण सुरु करण्यात आले. नंतर या सर्वेक्षणाच्या प्रचंड यशानंतर हे सर्वेक्षण व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, स्थापत्यशास्त्र इ. विविध अभ्यासक्रमांसाठी अवलंबण्यात आले.
२०१४ पासून सर्व प्रकारच्या तांत्रिक संस्थांचा जसे शासकीय, निमशासकीय, बिगरशासकीय इ. चा समावेश या सर्वेक्षणात करण्यात आला.
शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसीला स्टँडर्ड श्रेणी मधून या सर्वेक्षणात “सुवर्ण” नामांकनाचा बहुमान मिळाला असून पुन्हा एकदा आर. सी. पटेल फार्मसी चा उच्च शैक्षणिक दर्जा सिद्ध झाला.
या पूर्वी देखील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रंकिंग फ्रेमवर्क अंतर्गत महाविद्यालयाने देशभरातून राष्ट्रीय क्रमवारीत आहे. आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालय समाज उपयोगी संशोधन करण्यासाठी प्रसिद्ध असून आजपर्यंत तब्बल ८ कोटी रुपयांचा संशोधन निधी, अनुदान विविध राष्ट्रीय संशोधन संस्था जसे ए.आय.सी.टी.ई., यु.जी.सी., डी.एस.टी., डी.बी.टी., आय.सी.एम.आर., आयुष, इ. कडून प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाने आतापर्यंत १२ पेटंट फाईल केलेले असून २ पेटंट मंजूर झालेले आहेत. महाविद्यालया मधील प्राध्यापकांचे ११०० हून आधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त नियतकालिका मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आर. सी. पटेल मधील ४३ प्राध्यापकांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पीएच. डी. प्राप्त असून उर्वरित २५ प्राध्यापकांचे पीएच.डी. चे संशोधन चालू आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, ए.पी.टी.आय. चा प्रिन्सिपल ऑफ द इयर पुरस्कार, आउटस्टडिंग परफॉरमंस अवार्ड अशा अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले प्राचार्य डॉ. संजय सुराणा हे या महाविद्यालयाचे समर्थ नेतृत्व करत आहेत.
आंतरराष्ट्रीय मानदंडा नुसार असलेल्या प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक ही महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता गुणवान विद्यार्थ्यांसाठी सुमारे १ कोटींची पारितोषिके तसेच विशेष शिष्यवृत्ती योजना या मुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच नाही तर देशभरात आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचा नावलौकिक झाला आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध विक्रमांची नोंद केली आहे.
विद्यापीठीय परीक्षांत सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी या महाविद्यालयाचे असतात. केवळ औपचारिक शिक्षण हेच महाविद्यालयाचे धोरण नसून, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व परिपूर्ण होऊन तो जागतिक स्पर्धेला आत्मविश्वासाने सामोरा गेला पाहिजे म्हणूनच देश विदेशातील तज्ञाची व्याख्याने, प्रात्यक्षिके, शिबीर, चर्चासत्र या सारखे उपक्रम नेहमी राबविले जातात. रोजगाराभिमुखता हे या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य असून येथील विद्यार्थी नामवंत उद्योग समूहामध्ये मानाच्या पदावर कार्यरत आहेत.
विविध नामांकित औषध निर्मात्या कंपनीज उदा. कॅडीला हेल्थ केअर, टी. सी. एस., सन फार्मा, म्याकलॉइड, सिप्ला, लुपिन, एमक्युर, डॉ. रेड्डीज यांची कॅम्पस मुलाखतीसाठी याच महविद्यालयाची निवड करतात. इतरत्र विद्यार्थ्यांना रोजगाराची समस्या जाणवत असताना सर्वाधिक प्लेसमेंट होऊन येथील विद्यार्थी मोठ्या वेतन श्रेणीवर नियुक्ती मिळवत आहेत.
ए. आय. सी. टी. ई. आणि सी. आय. आय. या साठी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. हितेंद्र महाजन, रजिस्ट्रार जितेश जाधव यांनी हे काम केले.
संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन हसवानी आदींनी या उपलब्धी साठी सर्वांचे अभिनंदन केले.
Tags
news
