धुळे, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच जिल्हा प्रशासन आज वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. या विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी आणखी संयम ठेवत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आज येथे केले.
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास रक्त तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानदार चालक- मालक संघर्ष व समन्वय समितीने प्रतिसाद देत आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, अपर तहसीलदार संजय शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. संजय शिंदे, संघटनेचे अध्यक्ष महेश घुगे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्न केले. या सामूहिक प्रयत्नांमुळेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणू शकलो. रिकव्हरी रेटमध्ये धुळे जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला आहे. असे असले, तरी कोरोना विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. नियमितपणे मास्क वापरावा. हात वेळोवेळी साबण, सॅनेटायझरने स्वच्छ करावेत. वैद्यकीय महाविद्यालयास रक्ताचा तुटवडा भासत होता. अशा परिस्थितीत रक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असेही त्यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक श्री. पंडित म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीत स्वस्त धान्य दुकानदारांनी शेवटच्या घटकापर्यंत अन्नधान्य पोहोचविले. आता रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली असून हा उपक्रम कौतुकास्पद आहे. संघटनेचे अध्यक्ष श्री. घुगे यांनी सांगितले, दरवर्षी शिबिर घेतले जाते. यावर्षी जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आजचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. संघटनेचे नेहमीच जिल्हा प्रशासनाला सहकार्य राहिले आहे, असेही त्यांनी सांगितले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी आभार मानले.
