शिरपूर : येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयातील दिग्विजय नानू पाटील या विद्यार्थ्याने तयार केलेल्या 'स्मार्ट हेल्मेट सिस्टीम' या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर बक्षिसासाठी निवड झाल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आर. सी. पटेल विद्यालयातील अटल टिंकरींग लॅब मध्ये तयार केलेल्या 'स्मार्ट हेल्मेट सिस्टीम' या उपकरणाला रिजनल सायन्स सेंटर, भोपाल यांच्यामार्फत राष्ट्रीय स्तरावरील आयोजित केलेल्या नाविण्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्प निर्मिती स्पर्धेत दिग्विजय पाटील या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त केले असून ही फारच अभिमानास्पद व भूषणावह बाब आहे.
तालुक्यातील बलकुवे येथील नानु गजमल दोरीक या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा तो सुपूत्र असून त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मागील वर्षी देखील डिसेंबर-२०१९ मध्ये झालेल्या 'अविष्कार मॅकेथॉन' या स्पर्धेत दिल्ली येथे दिग्विजय पाटील याने सहभाग नोंदविला होता. हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी सुरुच होणार नाही, हा प्रोजेक्ट त्याने सादर केला होता. त्यावेळेस प्रोजेक्टची निवड झाल्याने त्याचा महाराष्ट्रात पहिला तर भारतात द्वितीय क्रमांक पटकावला होता.
दिग्विजय पाटील हा सातत्याने यशस्वीरित्या बक्षीसप्राप्त ठरत असून विद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी. व्ही. पाटील, पर्यवेक्षक एन.ई.चौधरी, सर्व विज्ञान शिक्षक यांनी कौतुक केले.
