धुळे, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या आणखी वाढवावी. ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेत 50 वर्षांपुढील कोमॉर्बिड आढळून येणाऱ्या नागरिकांचीही तपासणी करावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी मृत्यूदर कमी होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची प्राथमिक लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांचा सर्वाधिक संपर्क येणाऱ्या शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य् तपासणी करावी. आवश्यक तेथे रॅपिड अँटिजेन चाचणी करावी.
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेत प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य् विभागाच्या पथकांना नागरिकांनी सहकार्य करीत आवश्यक सर्व माहिती पुरवावी. या मोहिमेचा पुढील टप्पा 15 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होत आहे. त्यानुसार नियोजन करावे. तसेच या मोहिमेचा पालकमंत्री महोदय लवकरच आढावा घेणार आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंग यंत्रणा, कोविड कालावधीत कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडलेल्यांना द्यावयाच्या निधीचे प्रस्ताव आदींचा सविस्तर आढावा घेतला.
Tags
news
