शिरपूर (प्रतिनिधी) : मला अशा ठिकाणी जायचे असते जिकडंची वास्तविकता मला पाहता येईल. महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष हे पद फक्त शोभेसाठी नसून जनतेची सेवा करण्यासाठी असतं, असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई ठाकरे यांनी येथे केले. यावेळी त्यांच्यासह शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा या दुर्गम आदिवासी भागात सौ.ठाकरे यांनी भेट दिली. त्यांचे गावात उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्त्रीयांचा आदर्श सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तू, झोपड्यांमध्ये महिलांनी छोटेखानी उभारलेले प्रकल्प, किराणा दुकान यांचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. 'विकेल ते पिकेल' या कृषी विभागाच्या योजनेची सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऑनलाईन केली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण महिलांना, ग्रामस्थांना दाखवून शासनाची भूमिका समजावून सांगण्यात आली.
महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेली कामे, बचत गटांचे सक्षमीकरण, बचत गटांसाठी शासनाच्या नवीन योजना, उपक्रम यासंदर्भात सौ.ज्योतीताई ठाकरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मिशन बिगिन अगेन सुरु केले आहे. अर्थात कोविडच्या अंधारात न राहता आता आपण व्यवहार सुरु केले पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मोठ्या प्रमाणात घरीच कोविड मास्कचे बनविले. महामंडळामार्फत राज्यात 4 कोटीचे मास्क विकले. ज्यांना विकत घेता आले नाही त्यांच्यासाठी ते मोफत वाटले. राज्यात सर्वप्रथम प्लास्टीक बॅग बंदी ही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्यासाठी त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाला गेल्या वर्षी अडीच कोटी रुपये दिले होते. त्या अडीच कोटींच्या पिशव्या राज्यातील महामंडळातील महिलांनी शिवून त्या वाटल्या. महिलांना त्याचाही रोजगार मिळाला. एका पिशवीच्या शिवणाचे महिलांना साडेचार ते पाच रुपये मिळाले. महिलांचे चांगले काम बघून मंत्री आदित्य ठाकरे यांनी आणखी अडीच कोटी रुपये महामंडळाला दिले. महिला या प्रामाणिक असून महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या परतफेडीचा दर 99.50 टक्के आहे. माविमच्या माध्यमातून महिलांना बँकेला जोडून दिले. महिला आता त्यांच्या कमाईचे पैसे थेट बँकेत जमा करतात, असेही शेवटी त्यांनी सांगितले.
तद्नंतर उपस्थितांना शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, महिलांनी बनविलेल्या वस्तू या अतिशय चांगल्या दर्जाच्या आहे. या वस्तूंना शहरपर्यंत पोहचावून शिवसेनेच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी मोठं काम उभे केले आहे. निम्मा धुळे जिल्हा हा आदिवासी भाग म्हणून गणला जातो. येथील महिलांना महामंडळाच्या माध्यमातून लाभ मिळावा. येणाऱ्या कालखंडात महिलाभगिनी अधिकाधिक सक्षम कशा होतील, यासाठी प्रयत्न व्हावे अशी भावना श्री.साळुंके यांनी व्यक्त केली. जामन्यापाड्यातील महिला भगिनींनी पिण्याचे पाणी, बस, विजेची समस्या मांडल्यात. त्या सोडविण्याचे आश्वासन श्री. साळुंके यांनी दिले.
यावेळी शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, तालुकाप्रमुख भरतसिंह राजपुत, डॉ. जयश्री वानखेडे, विजय सिसोदे, मनोज धनगर, योगेश सूर्यवंशी, दिपक चोरमले, योगेश ठाकरे, अनिकेत बोरसे, विकास सेन, बबलू शेख सह आदिवासी, शेतकरी, महिला व बांधव उपस्थित होते.
