धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात सन 2018- 2019, 2019- 2020 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्यास त्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
धुळे जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयातील भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कांतर्गत 2018- 2019 व 2019- 2020 या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांचा बँक खात्याचा तपशील जुळत नसल्याने त्यांची रक्कम अवितरीत आहे. ज्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या योजनांचा लाभ मंजूर झाला आहे. मात्र, रक्कम वर्ग झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. त्यात अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न आहेत किंवा याची पडताळणी आधार पोर्टल http://resident.uidai.gov.in/bank-mapper या लिंकवर जावून खात्री करावी. तसेच आधार ॲक्टिव आहे किंवा नाही याचीही पडताळणी करावी.
विद्यार्थ्यांना महाडीबीटीद्वारे मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थी लॉग इनमधून व्हाऊचर त्वरीत रीडीम करावे. महाविद्यालयांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. त्यात ज्या विद्यार्थी व महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता मिळालेला आहे त्यांनी दुसऱ्या हप्त्याकरीता महाविद्यालय लॉगइनमधून दुसऱ्या सत्राची उपस्थिती भरुनच अर्ज मंजुरीकरीता विहीत मुदतीत पाठवावेत. महाविद्यालयाच्या लॉगइनमधून ALLOTMENT DATA WISE REPORT या पर्यायाचा वापर करून अर्ज Allote झाला किंवा नाही याची महाविद्यालयाने वेळोवेळी पडताळणी करून घ्यावी. Not Alloted अर्जांबाबतची त्रुटी पूर्तता करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना अवगत करावे.
महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉग इनमध्ये SUPPORT DESK मध्ये अर्ज क्रमांक निहाय शोध घेतल्यास अर्ज क्रमांकाला क्लिक केल्यानंतर सदरच्या अर्जावर झालेली कार्यवाही, विद्यार्थी व महाविद्यालयाला मिळणाऱ्या व मिळालेल्या रकमेचा तपशील आणि अर्जासंबंधित PFMS पोर्टलबाबतच्या त्रुटींची माहिती उपलब्ध आहे. ती विद्यार्थी निहाय दर्शवण्यिात येते. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचे आधार अथवा बँक खात्याशी संबंधित त्रुटी असल्यास त्वरीत विद्यार्थ्यांना अवगत करावे, असेही निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
