माजी उपसरपंच याच्याकडून मजुरांना मदत; मजुरांना अजून मदतीची गरज
शहादा (प्रतिनिधी) - शहादा तालुक्यातील भोरटेक चिखली खुर्दे येथे १५० मजूर पायपीट करीत आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात हे मजूर मालेगाव येथे अडकून पडले होते. भोरटेक व चिखली खुर्दे येथे आल्यावर त्यांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून गावाबाहेर शेतात क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र आता प्रश्न असा निर्माण होत होता की या १५० मजुरांना अन्न धान्याची सोय कोठून करावी. त्यावेळी भोरटेक चिखली खुर्दे येथील ग्रुपग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिलीप पवार यांनी एक क्विंटल गहू व एक क्विंटल तांदूळ उपलब्ध करून दिले, त्याच सोबत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून बाजार करून देण्यात आला. दुसऱ्या दिवशी दोन्ही गावांतून गहू, तांदूळ, डाळ गोळा करून देण्यात आली. मात्र १५० मजूर तेवढ्यावर काय होईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांना भोरटेक सुनील पवार यांनी कळविले असता तात्काळ आमदार पाडवी यांच्या मार्फत तांदूळ व डाळ पोच करण्यात आले. मजुरांना अजून मदतीची गरज आहे, त्यासाठी इतर संस्थांनी देखील पुढाकार घ्यावा अशी मागणी गावकरी व मजुरांकडून करण्यात येत आहे.
